बोईसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ३ लाखांचा २८ ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत

बोईसर, पालघर | प्रतिनिधी : बोईसर
शहरातील आठवडा बाजारात भाजीपाला खरेदी करून घरी परतणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ३ लाख रुपये किमतीची २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ लंपास करणाऱ्या दोन महिला आरोपींना बोईसर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण सोन्याचा ऐवज हस्तगत केला आहे.
नवापूर नाका परिसरात घडली घटना
नवापूर नाका, बोईसर येथील रहिवासी सौ. गीता गणपत ठाकूर (वय ७०) या २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बोईसर शहरातील आठवडा बाजारातून भाजीपाला खरेदी करून घरी परतत होत्या. याचदरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ शिताफीने लंपास केली.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी रज्जाबाई मोहन हतागळे उर्फ मांगारोडी (वय ४७) आणि रेणुका संजय हतागळे (वय ३५) या दोन महिला संशयितांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी उधना, सुरत, गुजरात येथील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव शेवाळेवाडी, जि. जळगाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चौकशीदरम्यान आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ लाख रुपये किमतीची २८ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ हस्तगत केली.
गर्दीच्या बाजारपेठांमध्ये वृद्धांना लक्ष्य?
आठवडा बाजार, गर्दीच्या बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी वृद्ध नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हेरून चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. या घटनेत बोईसर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिष देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, ऋषिकेश मुठे तसेच बोईसर पोलीस पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
