
मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा
वांद्रे (पूर्व) :
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या बहुप्रतिक्षित रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळणार आहे. आमदार वरुण सरदेसाई यांच्या पाठपुराव्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल ५४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सुधारणा केली जाणार असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या AW-293 या काम क्रमांकांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावात वांद्रे पूर्वमधील अनेक महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. आमदार सरदेसाई यांनी १६ जून २०२५ रोजी सादर केलेल्या निवेदनानंतर संबंधित विभागाकडून प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याचे कागदपत्रांत नमूद आहे.
नागरिकांच्या वाढत्या मागण्या, खड्डेमय रस्त्यांची अवस्था आणि वाहतुकीतील अडथळे लक्षात घेता या रस्त्यांचे तातडीने सुधारकाम करण्याची गरज होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार वरुण सरदेसाई यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या मंजुरीमुळे वांद्रे पूर्वमधील रस्त्यांची गुणवत्ता सुधारेल, वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.