
डहाणू दि. १८ नोव्हेंबर २०२५ :
डहाणू नगरपरिषद क्षेत्रासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात भाजपला नवी उर्जा देणारा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा आज डहाणू तालुक्यातील रामवाडी येथे पार पडला. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष श्री. भरत राजपूत यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महाराष्ट्र राज्य सचिव – अल्पसंख्याक विभाग श्री. वासिम सलीम पठाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली.
श्री. वासिम पठाण यांनी भाजपा प्रवेशानंतर बोलताना सांगितले की,
“भाजपाची विकासाभिमुख कार्यसंस्कृती, सर्वसमावेशक धोरणे आणि पालघर जिल्ह्यातील नेतृत्वाने केलेली जनहिताची कामे पाहून पक्षात येण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात डहाणू नगरपरिषद क्षेत्रात तसेच संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रियपणे योगदान देईन.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भरत राजपूत यांनी पठाण यांचे मनःपूर्वक स्वागत करत सांगितले,
“वासिम पठाण यांच्या प्रवेशामुळे भाजपला पालघर जिल्ह्यात आणि डहाणू नगरपरिषद क्षेत्रात निर्णायक बळ मिळणार आहे. त्यांच्या अनुभवामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत होईल.”
या प्रवेश सोहळ्याला भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच डहाणू, ठाणे व पालघर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण असून नव्या नेतृत्वाचे स्वागत करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
भाजपात झालेल्या या प्रवेशामुळे डहाणू नगरपरिषद निवडणुकीसह पालघर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.