जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते वनहक्क पट्टे वाटप; आदिवासी भागांच्या हक्कसंरक्षणाला नवी ताकद”

पालघर, दि. 12 डिसेंबर :
पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांच्या विकास व हक्कसंरक्षणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते एकूण 1234.551 हेक्टर आरक्षीत वनक्षेत्राचे सामूहिक वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले. जव्हार तालुक्यातील चिंचवाडी व भोपतगड परिसरात आयोजित या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात विविध गावांच्या सामूहिक वनहक्क समित्यांना पट्टे प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात सोनगीरपाडा–घाटाळपाडा (610.37 हे.आर.), अनंतनगर–कोगदा (192.181 हे.आर.), हाडे–देवीचापाडा (132 हे.आर.), तसेच झाप–चिंचवाडी (300 हे.आर.) या गावांना सामूहिक वनहक्क पट्ट्यांचे वितरण झाले. हाडे (देवीचा पाडा), ऐन (सोनगीर पाडा), चिंचवाडी आणि कोगदा (अनंतनगर) येथील वनहक्क समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्या हाती अधिकृतपणे पट्टे सुपूर्द करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत वनव्यवस्थापन, हक्कसंरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत मार्गदर्शन केले. सामूहिक वनहक्कामुळे स्थानिक आदिवासी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण, जंगल संसाधनांवरील स्वामित्व आणि पारंपरिक हक्क अधिक बळकट होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी चिंचवाडी येथील आरोग्य तपासणी शिबिराला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत आरोग्य उपक्रमांचे कौतुक केले. त्यानंतर भोपतगड किल्ल्याची पाहणी करून ग्रामसभेत सहभागी होत ग्रामस्थांच्या विविध शंका समाधान सत्रात त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.

या कार्यक्रमाला वयम संस्थेचे अध्यक्ष मिलिंद थत्ते, प्रभारी तहसीलदार सुरेश कामडी, उपवनसंरक्षक सैपुन शेख, प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी अभयकुमार टकले, श्री. रास्ते, श्री. टीके तसेच महसूल व वनविभागातील अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या ऐतिहासिक निर्णयामुळे भोपतगड, चिंचवाडी व आसपासच्या आदिवासी भागांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून वनहक्काच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button