
पालघर :
पालघर नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच अनुभवी, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी देण्याच्या उद्देशाने पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व नामांकित कायदेतज्ज्ञ अॅड. जयेश रघुनाथ आव्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजपच्या संघटनात्मक कार्याला तसेच पालघर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अॅड. जयेश आव्हाड हे कायदा, समाजकार्य आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व जबाबदारीने पार पाडल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचे अर्ज नियमानुसार भरणे, निवडणूक खर्च प्रतिनिधी म्हणून काम करणे तसेच निवडणूक प्रक्रियेतील कायदेशीर बाबी हाताळण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
व्यवसायाने वकील व कर सल्लागार असलेले अॅड. जयेश आव्हाड हे B.Com., LL.B., G.D.C.&A., D.T.L., D.L.L. & L.W. या उच्च शैक्षणिक पात्रतेचे धारक असून, १९९९ पासून ते वकिली आणि कर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ पासून ते भारतीय जनता पक्षात सक्रिय असून, कायदा प्रकोष्ठ जिल्हा संयोजक तसेच सध्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते रोटरी क्लब ऑफ पालघर (2023–24) चे माजी अध्यक्ष, आयर्न वेल्फेअर क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष, जनविकास ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे संचालक, लाडकी लेक गौरव संस्था व यश फाउंडेशनचे सचिव, अपंग पुनर्वसन सेवा संस्थेचे उपाध्यक्ष, शिधा सेवायतनचे खजिनदार तसेच पालघर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. विविध सामाजिक संस्थांमधील त्यांची भूमिका समाजहितासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असूनही पक्षाने अन्य उमेदवाराची निवड केल्यानंतर त्यांनी कोणतीही नाराजी न दर्शवता पक्षनिष्ठा जपत कार्य सुरू ठेवले. त्यांच्या संयम, निष्ठा, अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती व प्रामाणिकतेची दखल घेत भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर स्वीकृत नगरसेवकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
अॅड. जयेश आव्हाड यांची ही निवड भाजपसाठी तसेच पालघर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आशादायक मानली जात असून, आगामी काळात प्रशासन, विकासकामे, कायदेशीर मार्गदर्शन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहील, असा विश्वास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.