राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा : “खेळाडू संकटात कधीच डगमगत नाही” – प्राचार्य डॉ. किरण सावे

पालघर, दि. 15 जानेवारी :
खेळाडू हा कुठल्याही संकटाला न घाबरता धैर्याने सामोरा जातो. अपयश आले तरी तो खचून न जाता पुन्हा उभा राहतो, हीच खेळाडूची खरी ताकद आहे. त्यामुळे कला, क्रीडा, नोकरी, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात खेळाडू यशस्वी ठरतो, असे प्रतिपादन दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिनानिमित्त पालघर येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, खाशाबा जाधव हे नाव केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून ते क्रीडा क्षेत्रातील प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जिद्द, चिकाटी व देशाभिमानातून आजच्या खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी व ही ऊर्जा पदकांमध्ये रूपांतरित करावी. ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून दांडेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडा संकुल येथे सॉफ्टबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आदी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा मार्गदर्शक आणि पंच यांचा गौरव करण्यात आला.
तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी 15 जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले.
या कार्यक्रमास दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, क्रीडा संचालक संतोष चुरी, सत्तू कदम महाविद्यालयाचे प्रीतम घरत, दिगंबर कदम, शुभांगी पाटील, प्रितेश पाटील, राकेश ठाकरे, उज्वला लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य क्रीडा दिनाच्या निमित्ताने पालघरमध्ये खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा व प्रेरणा निर्माण झाली असून, खाशाबा जाधव यांच्या विचारांना उजाळा देत क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button