मराठी व्यावसायिकांनी गुजरातमध्येही व्यवसाय विस्तारावा – पालकमंत्री गणेश नाईक यांचे आवाहन

पालघर : मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. योग्य प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास तो देशभर आपला ठसा उमटवू शकतो. त्यामुळे मराठी व्यावसायिकांनी केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता गुजरातसारख्या राज्यांमध्येही व्यवसाय विस्तार करून संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
शिरगाव समुद्रकिनारी आयोजित ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी कोकणातील उद्योग, कला आणि संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
नाईक म्हणाले, “बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील अंतर कमी होणार आहे. या संधीचा फायदा घेत मराठी उद्योजकांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा. महाराष्ट्रातील उत्पादने आणि कौशल्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.”
यावेळी त्यांनी शिरगाव समुद्रकिनाऱ्याचा आदर्श समुद्रकिनारा म्हणून विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. पर्यटनवृद्धीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “कोकण भूमी प्रतिष्ठान” आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून स्थानिक कलाकार, महिला बचतगट, लघुउद्योग आणि ग्रामीण उत्पादकांना यामध्ये सहभागाची संधी देण्यात आली आहे.
महोत्सवात कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, लोककला, हस्तकला, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
राज्य सरकारकडून अशा उपक्रमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. निधी अपुरा पडल्यास सामाजिक दायित्व निधीतूनही मदत करण्यात येईल, अशी ग्वाही नाईक यांनी दिली.
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’मुळे कोकणच्या सांस्कृतिक वारशाला आणि उद्योगांना नवे बळ मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button