
पालघर नगर परिषद कडून मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी “अभय योजना” जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ही योजना लागू करण्यात आली असून थकित मालमत्ता करावरील दंडामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत १९ मे २०२५ पर्यंत थकित असलेल्या मालमत्ता करावर लागलेल्या दंडापैकी ५० टक्के दंड माफ करण्यात येणार आहे. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी उर्वरित संपूर्ण देय रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे.
ही अभय योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार असून पालघर नगर परिषद क्षेत्रातील सर्व मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच नगराध्यक्ष उत्तम मोरेश्वर घरत यांनी नागरिकांना थकित मालमत्ता कर भरून शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
पालघर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कराची थकबाकी भरावी आणि दंडावरील सवलतीचा फायदा घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
