“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा राज्यभर शुभारंभ

मुंबई, दि. ७ : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा भव्य शुभारंभ केला. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती देत, या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण बनवणे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अभियानासंदर्भातील माहितीपट व पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
राज्य शासनाच्या या उपक्रमात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यावर लक्ष केंद्रीत करून ग्रामीण जनतेच्या आरोग्यदायी जीवनशैलीला चालना दिली जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांनाही या मोहिमेत विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून तब्बल ६५.२५ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ सरकारी योजना नसून लोकसहभागातून उभी राहणारी आरोग्य चळवळ आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महाराष्ट्रात निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज निर्माण होईल, असा विश्वास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button