
पालघर, दि. 11 एप्रिल: नागरिकांच्या महसूल विषयक कामांना गती देण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बोईसर मंडळातील डॉ. एस. डी. वर्तक विद्यालय, विद्यांगार (खैरापाडा) येथे ‘महासुल समाधान शिबिर (पहिला टप्पा)’ यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तेजस चव्हाण, नायब तहसीलदार (बिगर कृषी) तुषार शिंदे यांच्यासह स्थानिक सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच तसेच विविध विभागांचे अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांना विविध महसूल सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने दाखले वितरण, 7/12 उतारा व 8अ दुरुस्ती, फेरफार नोंदी, ई-मोजणी, हद्द निश्चिती, बिगर कृषी मार्गदर्शन तसेच पीएम-किसान योजनेअंतर्गत मदत यांचा समावेश होता. ‘एक दिवसात सेवा वितरण (Single Day Service Delivery)’ या संकल्पनेतून नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे त्वरित निवारण करण्यात आले.
याशिवाय, नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व वितरण, आपत्ती सहाय्यासाठी ई-केवायसी, मतदार नोंदणी व वगळणी सेवा, तसेच आरोग्य तपासणी यांचा लाभ मिळाला. कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, जिल्हा उद्योग केंद्र आणि आदिवासी विकास विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शनही देण्यात आले.
वधावन बंदर (ग्रीनफिल्ड महामार्ग) प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष सुविधा केंद्र देखील उभारण्यात आले होते. शिगाव, गारगाव, राणीशिगाव, नेवाळ व खुटाड या गावांतील जमीनधारकांना 7/12 व हक्क नोंदी अद्ययावत करण्यासाठी तसेच भूसंपादन भरपाई प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्यात आल्या.
तसेच, मृत्यू नोंदणी न झाल्यामुळे वारस हक्क प्रकरणे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर विशेष कार्यपद्धती राबविण्यात आली. ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र अहवाल तयार करून मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तलाठ्यांकडे पाठवून तहसीलदारांकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आले.
या शिबिरात एकूण 1,283 सेवा व दाखले वितरित करण्यात आले. एकाच ठिकाणी जलद व प्रभावी सेवा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.