पालघर वाहतूक शाखेची दमदार कारवाई – १० दिवसांत १०७० केसेस, १४ लाखांहून अधिक दंड वसूल!
पालघर : ‘इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन’ने केलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई तीव्र करण्यात आली. जिल्ह्यात वाहतूक शिस्तीला लागलेला बळकट लगाम दिसून येत आहे.
वाहतूक शाखा प्रमुख अनिल व्हटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच वाहतूक शाखेने जोरदार कारवाई करत १०७० केसेस नोंदवून तब्बल ₹१४,१७,१०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या कारवाईत सर्वाधिक गुन्हे ड्रिंक अँड ड्राईव्ह, विनाहेल्मेट वाहनचालक, ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग आणि मोबाईलवर बोलत वाहन चालवणे या प्रकारांमध्ये आढळून आले आहेत.
अपघात कमी करणे हे मुख्य लक्ष्य
पालघर जिल्ह्यातील स्टेट हायवे व नॅशनल हायवेवरील फेटल अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि शहरातील वर्दळीचे चौक सुरळीत ठेवणे हा ट्रॅफिक विभागाचा प्रमुख उद्देश आहे.
विशेष लक्ष कोणावर?
- डिलिव्हरी बॉय आणि वेगाने वाहन चालवणारे बाइक चालक
- नियम मोडणारे रिक्षा चालक
- बाइक स्टंट करणारे कॉलेज विद्यार्थी
- शहरात येणारी अवजड वाहतूक
हायवेवर कडक गस्त
इंटरसेप्टर वाहनं आणि बाइक पेट्रोलिंगद्वारे दररोज गस्त ठेवण्यात येत आहे, ज्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होत आहे.
आधुनिक उपाययोजना सुरू
- दिशादर्शक फलक, स्पीड ब्रेकर, रम्बलर स्ट्रिप आणि कॅट आयज बसवणे
- ब्लॅक स्पॉट्सवर हायमास्ट लाईट्स लावणे
- स्पीड लिमिट कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया
- NHAI, PWD आणि नगरपरिषद यांच्यासोबत समन्वय
नागरिकांसाठी जनजागृती
शहरातील महत्वाच्या ठिकाणी एकूण ८ LED स्क्रीन बसवण्यात आल्या असून, त्यावर वाहतूक नियम, सूचना आणि जनजागृती संदेश दाखवले जात आहेत.