
पालघर, दि. २६ एप्रिल २०२६ : रिक्षाचालकाची फसवणूक करून सोन्याची चैन लंपास करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करत उत्कृष्ट तपासकौशल्याचे दर्शन घडवले आहे.
दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी रूपेश रमेश खुर्दे (रा. कचेरी रोड, आंबेडकर नगर, पालघर) हे आपल्या रिक्षामध्ये प्रवासी घेऊन बोईसरकडे जात होते. प्रवासादरम्यान अनोळखी आरोपीने त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधत मधुर नाका येथील वाईन शॉपमधून बिअर घेण्यास सांगितले. त्यानंतर गोड बोलून आरोपीने खुर्दे यांच्याकडील सुमारे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन पाहण्याच्या बहाण्याने घेतली आणि लघुशंकेचे कारण सांगून पसार झाला.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत मोहम्मद उमर शहा (वय ४३, रा. अंबरनाथ) याला सापळा रचून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची चैनही जप्त केली आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. नितीन नरळे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील जाधव व त्यांच्या पथकाने केली.
पालघर पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.