वाढवण बंदराच्या ‘कोट्यवधीं’वर डल्ला; निरक्षर शेतकऱ्याची ५० लाखांना लुबाडणूक!

​पालघर | विशेष प्रतिनिधी

बोईसर हादरले: शासकीय मोबदला लवकर मिळवून देण्याच्या बहाण्याने अंगठे बहाद्दरांनी घातला दरोडा; तिघांवर गुन्हा दाखल

वाढवण बंदर प्रकल्पाच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन मोबदल्यावर आता भामट्यांनी सावज टिपण्यास सुरुवात केली आहे. डहाणूतील एका निरक्षर आणि निष्पाप शेतकऱ्याला जाळ्यात ओढून तब्बल ५० लाख २७ हजार ७६० रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. “शासकीय मोबदला लवकर मिळवून देतो,” असे आमिष दाखवून तिघा भामट्यांनी शेतकऱ्याचा विश्वासघात केला. याप्रकरणी बोईसर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
​असा रचला फसवणुकीचा चक्रव्यूह:
डहाणू तालुक्यातील तवा मोहंडकर पाडा येथील रहिवासी किरण पांडू पालवा यांची शेतजमीन वाढवण बंदर (ग्रीनफिल्ड महामार्ग) प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यापोटी त्यांना मोठी रक्कम मिळणार होती. फिर्यादी पालवा हे निरक्षर असल्याचा फायदा आरोपींनी उठवला. त्यांना बोईसर येथील कोटक महिंद्रा बँकेत नेऊन विविध कागदपत्रांवर सह्या आणि अंगठ्याचे ठसे घेण्यात आले.
​बँक खात्याचा ताबा घेतला स्वतःकडे!
आरोपींनी अत्यंत चलाखीने शेतकऱ्याच्या बँक खात्याशी स्वतःचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी लिंक केले. त्यानंतर शेतकऱ्याला थांगपत्ताही लागू न देता त्याच्या खात्यातून ५० लाखांहून अधिक रक्कम परस्पर लांबवली.
​या ‘अंगठेबहाद्दरांवर’ गुन्हा दाखल:
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किरण पालवा यांनी बोईसर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत सुरज गिंभल, धर्मा वळवी आणि प्रसाद उर्फ मॉन्टी पाटील या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
​पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये:
पालघरचे पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसरचे प्रभारी अधिकारी श्री. सुनील जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button