पालघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! तारापूर येथील जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघड; दोन आरोपी जेरबंद, सोन्याचे मंगळसूत्र व दुचाकी जप्त

पालघर : तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पालघर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेले सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात मोठे यश मिळवले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे पालघर पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन दिनेश म्हात्रे (वय ६३, रा. कुडण नवपाडा, ता. जि. पालघर) या २५ मे २०२६ रोजी सायंकाळी भाजीपाला विक्री करून घरी परतत होत्या. सायंकाळी सुमारे ७:४० वाजण्याच्या दरम्यान त्या कुडण नवपाडा बसस्टॉपजवळ रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि तारापूर पोलिसांनी संयुक्तपणे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी दर्शन जगदीश मोरे (वय २४) आणि प्रनेश उर्फ प्रफुल्ल सुरेंद्र पाटील (वय २६, दोघेही रा. घिवली, पूर्व भंडारआळी, ता. जि. पालघर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH-48-CW-0515 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना ३० मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बसवंडे/बनसोडे करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सपोनि योगेश शिंदे, पोउपनि गोरखनाथ राठोड, रविंद्र वानखेडे तसेच अंमलदार दिनेश गायकवाड, संजय धांगडा, कैलास पाटील, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, कल्याण केंगार, प्रशांत निकम आणि महेश अवतार यांच्या पथकाने पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button