
पालघर, प्रतिनिधी :
गोठणपूर परिसरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती व रुंदीकरणाच्या महत्त्वपूर्ण विकासकामांदरम्यान नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी पालघर ट्रॅफिक पोलिसांनी प्रभावी नियोजन करत आदर्श वाहतूक व्यवस्थापन उभे केले आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक बॅरिकेड्स, सुरक्षा फिती आणि वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश मिळत आहे.
रस्ते विकासकामांमुळे निर्माण होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन ट्रॅफिक विभागाने विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था, दिशादर्शक फलक तसेच सततचे मार्गदर्शन यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
स्टेशन ते हुतात्मा चौक या महत्त्वाच्या मार्गावर वाहतुकीचे नियोजनबद्ध नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असून ते वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे विकासकामे सुरू असतानाही वाहतुकीचा वेग आणि शिस्त कायम राखण्यात यश आले आहे.
तसेच अनधिकृत पार्किंग रोखणे, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणे आणि वाहतुकीबाबत जनजागृती करणे या बाबींवरही विशेष भर देण्यात येत आहे. वाहतूक नियंत्रण, जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पालघर ट्रॅफिक विभाग शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
गोठणपूर येथील रस्ते विकासकामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासन, वाहतूक विभाग आणि नागरिक यांच्या समन्वयातून पालघर शहर अधिक शिस्तबद्ध आणि कोंडीमुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.