वॉर्ड क्रमांक ९४ मधील गटार चेंबर्सची दयनीय अवस्था; पावसाळ्यापूर्वी साफसफाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप

मुंबई प्रतिनिधी प्रीती गडा

मुंबई महानगरपालिकेच्या H/E वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक ९४ मधील स्टेशन रोड ते जवाहर नगर मेन रोड परिसरात गटार चेंबर्सची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून पावसाळा तोंडावर असतानाही अनेक चेंबर्सची साफसफाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात पाणी साचणे, दुर्गंधी पसरणे तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जयेश सुपर मार्केट, गणेश अगरबत्ती स्टोअर, निरंकार पानबिडी शॉप तसेच जवाहर नगर मेन रोडलगत असलेल्या अनेक गटार चेंबर्समध्ये गाळ व कचरा साचला असून ते तुडुंब भरलेले आहेत. काही ठिकाणी चेंबर्स शोधूनही सापडत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागरिकांनी असा आरोप केला आहे की, सन २०२४ मध्ये महानगरपालिकेमार्फत नवीन गटार बांधकाम करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी आवश्यक असलेले लहान चेंबर्सच बांधण्यात आले नाहीत. यामुळे भविष्यात देखभाल आणि साफसफाईच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांची चौकशी करून बांधकामातील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या समस्येबाबत H/E वॉर्ड कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. वॉर्ड अधिकारी मृदुला अंडे यांची भेट घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले, मात्र विविध कारणांमुळे भेट मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना पुढील तारखा देत असल्याचेही सांगण्यात आले.


“पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले व चेंबर्सची संपूर्ण साफसफाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा पहिल्याच मुसळधार पावसात जवाहर नगर परिसरात पाणी साचण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते,” अशी चिंता स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी व्यक्त केली आहे.


नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, गटारांची साफसफाई पूर्ण करावी आणि बांधकामातील त्रुटींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button