पालघर पोलिसांची मोठी कामगिरी; डहाणूतील ७ घरफोडीचे गुन्हे उघड, १४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

पालघर | प्रतिनिधी

दोन सराईत आरोपी अटकेत; सोन्या-चांदीसह रोख रक्कम हस्तगत

डहाणू तालुक्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या मालिकेचा अखेर पालघर पोलिसांनी यशस्वी छडा लावत मोठी कामगिरी बजावली आहे. घोलवड, डहाणू आणि वाणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी तब्बल १४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईची सुरुवात बोर्डी येथील ज्येष्ठ नागरिक सतीश शरदचंद्र बर्वे (वय ७४) यांच्या घरफोडीच्या गुन्ह्यापासून झाली. बर्वे यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीची नाणी तसेच रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डहाणू तालुक्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. घोलवड पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. अखेर नालासोपारा येथून हसमत अली ताहिर शेख (३३) आणि अन्वर अली ताहिर शेख (४१) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपी सध्या नालासोपारा पूर्व येथे वास्तव्यास असून मूळचे उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी डहाणू तालुक्यातील विविध भागांमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबातून घोलवड पोलीस ठाण्यातील ३, डहाणू पोलीस ठाण्यातील २ आणि वाणगाव पोलीस ठाण्यातील २ असे एकूण ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.
पोलिसांनी आरोपींकडून ७ तोळे सोने, १ किलो चांदी, १ लाख १ हजार रुपये रोख रक्कम तसेच जॅग्वार कंपनीचे नळ असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जाधव करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप कहाळे, पोउपनि विशाल पवार, परमेश्वर जाधव, कृष्णा पवार तसेच त्यांच्या संपूर्ण तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश करून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, डहाणू परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button