
पालघर | प्रतिनिधी
पालघर नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आरोग्य विभागाकडून केवळ दिखाऊ कारभार केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध होऊनही अनेक भागांतील परिस्थिती जैसे थे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या मते, शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, अस्वच्छ परिसर आणि आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या समस्या सातत्याने वाढत आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी भेट देतात, मात्र प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी केवळ फोटो काढून काम झाल्याचा आभास निर्माण केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही या विषयावर अनेकदा लेखी तक्रारी देण्यात आल्या तसेच वृत्तपत्रांमधून बातम्याही प्रसिद्ध झाल्या; मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून आलेली नाही.
याशिवाय, आरोग्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा “साहेब बैठकीत आहेत”, “बाहेर गेले आहेत” किंवा इतर कारणे सांगून परत पाठवले जात असल्याची तक्रारही समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासन कितपत गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात अशीही चर्चा रंगू लागली आहे की, वारंवार तक्रारी आणि बातम्यांनंतरही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वरिष्ठ स्तरावर सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दाखवले जात आहे का? मात्र या चर्चांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
सार्वजनिक आरोग्य हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित विषय असल्याने केवळ कागदोपत्री अहवाल, पाहण्या किंवा फोटोसेशन करून समस्या सुटणार नाहीत. प्रत्यक्ष स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक सेवा सुधारण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याची मागणी पालघरकरांकडून होत आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
“फोटो काढून काम झाल्याचे दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करा आणि शहर स्वच्छ ठेवा,” असा संतप्त सूर आता पालघरकरांमधून उमटत असून, प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.