खार (पूर्व) रेल्वे पुलाजवळ फेरीवाले व अतिक्रमणाचा विळखा; उच्च न्यायालयाच्या आदेशालाच BMC H/E वॉर्डकडून हरताळ?

मुंबई | खार (पूर्व)

रुग्णवाहिका, प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल; नागरिकांकडून सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप

खार (पूर्व) रेल्वे पुलापासून जवाहर नगर रोडवरील सुमारे १५० मीटर परिसरात बेकायदेशीर फेरीवाले, हातगाड्या, पदपथावरील दुकाने आणि नो-पार्किंगमध्ये उभ्या वाहनांमुळे गंभीर अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शाळा, मंदिर आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातील पदपथ व गटारे पूर्णपणे व्यापल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या अतिक्रमणामुळे परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी होत असून, बांद्रा टर्मिनसकडे जाणारे हजारो प्रवासी, व्ही. एन. देसाई रुग्णालय व इतर रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याने एखादी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या H/E वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती मृदुला आंडे आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी नागेश साटम यांनी या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने रस्ते आणि पदपथांवरील बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात वेळोवेळी कठोर निर्देश दिले असतानाही, खार (पूर्व) परिसरात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दरम्यान, काही स्थानिक नागरिकांनी या अतिक्रमणामागे संबंधित यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून त्याबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करावा, फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, नो-पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी आणि शाळा, मंदिर तसेच रुग्णालयांकडे जाणाऱ्या मार्गांवरील पदपथ नागरिकांसाठी मोकळे करावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button