डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज कायमचा हरपला; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. १८ : युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, माजी आमदार आणि समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी, समाजवादी आणि परिवर्तनवादी चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी तीव्र शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
रामदास आठवले यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. कुमार सप्तर्षी हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणारे पोलादी विचारवंत आणि संघर्षशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर दलित, शोषित, पीडित, आदिवासी, कामगार आणि कष्टकरी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा राखली.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात दलित पँथरसोबत युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी भूमिका बजावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती त्यांना असलेली निष्ठा आणि सामाजिक न्यायासाठीचा त्यांचा संघर्ष कायम प्रेरणादायी राहील, असे आठवले यांनी नमूद केले.
जातीय विषमता, अन्याय, अत्याचार आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी सातत्याने जनजागृती केली. गांधीवादी आणि समाजवादी विचारांचा पुरस्कार करत त्यांनी पुरोगामी चळवळीला वैचारिक बळ दिले. त्यांच्या निधनामुळे समाजवादी आणि पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज कायमचा हरपला असून महाराष्ट्राने एक ऋषितुल्य, अभ्यासू आणि निर्भीड नेतृत्व गमावले आहे, अशी भावना आठवले यांनी व्यक्त केली.
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचा वारसा समाजातील परिवर्तनवादी चळवळींना भविष्यातही प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त करत रामदास आठवले यांनी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button