
पालघर | प्रतिनिधी
पालघर येथील सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारी अवघ्या ८ वर्षांची ईवा विनायक नरळे हिने अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या वेशभूषेत आणि आत्मविश्वासपूर्ण शैलीत साकारलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
शालेय गणवेशासोबत पोलीस अधिकाऱ्याचा लूक, शिस्तबद्ध चाल, सलामी आणि आत्मविश्वासपूर्ण हावभाव यामुळे ईवाच्या सादरीकरणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लहान वयातच तिने पोलीस दलाविषयीचा आदर आणि देशसेवेची प्रेरणा प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
ईवा सध्या सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल, पालघर येथे शिक्षण घेत असून तिच्या या सादरीकरणामुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले जात आहे.
ईवाच्या या प्रेरणादायी सादरीकरणाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत अनेकांनी तिचे कौतुक केले असून, भविष्यात तीही समाजसेवेत मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.