
पालघर | प्रतिनिधी
वाढवण बंदर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात आणि मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ वरोर नाका येथे आंदोलनासाठी निघालेल्या नागरिकांना पोलिसांनी अडविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पालघर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही व घटनात्मक अधिकार असल्याचे सांगितले. आंदोलनासाठी निघालेल्या नागरिकांना रोखणे ही लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधातील कृती असल्याचा आरोप त्यांनी केला.
कॅप्टन ठाकूर यांनी राज्यातील फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, “लोकशाहीत विरोधाचा आवाज दाबणे ही कायरतेची निशाणी आहे. आम्ही घाबरणार नाही. संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असे स्पष्ट केले.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांच्या जमिनी, पर्यावरण आणि उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणावर प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, आंदोलन आणि पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे वाढवण बंदर प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.