खार (पूर्व) गोलीबार रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य, बेकायदा पार्किंग आणि अतिक्रमणाचा विळखा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, बीएमसी प्रशासन झोपेत?

मुंबई | प्रतिनिधी : प्रीती गडा

मुंबई महानगरपालिकेच्या एच/पूर्व (H/East) प्रभागातील वॉर्ड क्रमांक ९४ अंतर्गत खार (पूर्व) येथील गोलीबार रोड परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. युवा शिवसेना संपर्क कार्यालयासमोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, दोन्ही बाजूंना सुरू असलेले बेकायदा दुचाकी पार्किंग आणि फुटपाथवरील अतिक्रमण यामुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हा रस्ता बांधून अवघी दोन वर्षेही पूर्ण झाली नसताना त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि दुचाकीस्वार सर्वाधिक संकटात सापडले आहेत.

याहून गंभीर बाब म्हणजे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकींचे बेकायदा पार्किंग करण्यात येत असल्याने फुटपाथ पूर्णपणे अडवले गेले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरून चालावे लागत असून वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. सततची वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी बीएमसी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “रस्ता बांधून दोन वर्षेही झाली नाहीत, मग एवढ्या लवकर रस्त्याची वाट कशी लागली? निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही? संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई कधी होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या मते, सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर रस्त्यांची अशी अवस्था होत असेल, तर कामाच्या गुणवत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून संपूर्ण कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या :
गोलीबार रोडवरील सर्व खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
फुटपाथवरील अतिक्रमण त्वरित हटवावे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या बेकायदा पार्किंगवर कठोर कारवाई करावी.
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून ब्लॅकलिस्ट करावे.
संबंधित बीएमसी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.

आता सर्वांचे लक्ष बीएमसी प्रशासनाकडे लागले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासन तातडीने पावले उचलणार, की पुन्हा एखाद्या मोठ्या अपघातानंतरच जाग येणार? असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button