पालघर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्याचा ‘पाण्यात खेळ’; मोटारी लावून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई कधी?

पालघर | प्रतिनिधी

‘एकाला भरपूर, तर दुसऱ्याच्या नळाला थेंबही नाही’; गोरगरीब नागरिकांचा संताप, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पालघर नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा सुरू होताच काही नागरिकांकडून थेट पाइपलाइनवर अनधिकृतपणे पाण्याच्या मोटारी लावून पाणी खेचले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे पाइपलाइनमधील पाण्याचा दाब कमी होत असून, विशेषतः शेवटच्या टोकाला असलेल्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्याची वेळ होताच काही ठिकाणी मोटारी सुरू करून मोठ्या प्रमाणात पाणी खेचले जाते. परिणामी एका घरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असताना त्याच परिसरातील अनेक घरांच्या नळांना मात्र पुरेसे पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे ‘एकाला भरपूर आणि दुसऱ्याला थेंबही नाही’ अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

मोटार लावणाऱ्यांवर नगरपरिषदेची नजर आहे का?

पालघर शहरातील विविध भागांत, तसेच अदिती परिसरासह इतर भागांतही हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित प्रकाराची माहिती नगरपरिषद प्रशासनाला देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘नियम सर्वांसाठी समान आहेत की काही मोजक्या नागरिकांसाठी वेगळे?’ असा सवाल आता पालघरकरांकडून उपस्थित केला जात आहे.

नियमित पाणीपट्टी आणि कर भरणाऱ्या नागरिकांना जर त्यांच्या हक्काचे पाणी पुरेशा दाबाने मिळत नसेल, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गोरगरीबांचा पाणीहक्क हिरावला जात असताना प्रशासन गप्प का?

पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. काही व्यक्तींच्या मनमानीमुळे इतर नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असेल, तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पालघर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केवळ तक्रारींची वाट न पाहता पाणीपुरवठ्याच्या वेळेत अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

अनधिकृतपणे पाइपलाइनवर मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, नियमबाह्य मोटारी जप्त कराव्यात आणि वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाणीपुरवठा विभाग ‘जागा’ होणार का?

पालघर शहरातील सर्व भागांत पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून पाइपलाइनवर अनधिकृतपणे मोटारी लावणाऱ्यांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पाण्याचा दाब, वितरण व्यवस्था आणि शेवटच्या टोकावरील नागरिकांना मिळणारा पाणीपुरवठा याचेही परीक्षण करण्याची मागणी होत आहे.
पालघर नगरपरिषद प्रशासन आता तरी झोपेचे सोंग सोडून कारवाई करणार का?

सर्व नागरिकांना समान व सुरळीत पाणीपुरवठा मिळणार कधी? याकडे पालघरकरांचे लक्ष लागले आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने ठोस पावले उचलली पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button