
पालघर | प्रतिनिधी
पालघर आणि बोईसर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त पार्किंग आणि रस्त्यावरील दुहेरी वाहनतळाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पालघर वाहतूक पोलिसांनी आता कडक पवित्रा घेतला आहे. ‘डबल पार्किंग’ करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक विभागाने धडक कारवाईची मोहीम सुरू केली असून, नियम मोडणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनिल व्हटकर (प्रमुख, पालघर वाहतूक शाखा) यांनी पथकाचे नियोजन करून पालघर आणि बोईसरमधील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांवर कारवाईला वेग दिला आहे.
डबल पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा
पालघर आणि बोईसर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याबरोबरच त्याच्या बाजूलाच दुसरी वाहने उभी केली जात असल्याने ‘डबल पार्किंग’ची समस्या गंभीर बनली आहे. परिणामी रस्त्याची उपलब्ध जागा कमी होऊन वाहनांची कोंडी होते आणि अनेकदा वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागतात.
या प्रकारामुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.
प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष
वाहतूक विभागाने शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून, पुढील काळातही ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अनिल व्हटकर (प्रमुख, पालघर वाहतूक शाखा)
यांच्या नियोजनामुळे वाहतूक पोलिसांचे पथक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याने नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
‘नियम पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, रस्त्यावर दुहेरी पार्किंग करू नये आणि इतर वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पालघर–बोईसरमधील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या धडक मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई झाली, तर शहरातील डबल पार्किंगच्या समस्येला मोठ्या प्रमाणात आळा बसून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.