पूरग्रस्तांच्या मदतीसाठी CSRचा हातभार; निऑन आणि सनटेक फाउंडेशनकडून पालघर जिल्ह्यात मोठी मदत

पालघर | प्रतिनिधी

३,१०० बिगर-अन्न मदत किट्स, १,००० अन्नधान्य किट्स आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा; जिल्हा प्रशासनाच्या मदतकार्याला बळ

पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या बचाव व पुनर्वसन कार्याला कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (CSR) माध्यमातून मोठा हातभार मिळाला आहे. निऑन फाउंडेशन आणि सनटेक फाउंडेशन यांनी पूरग्रस्त कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात मदत साहित्य उपलब्ध करून दिले असून, या सहकार्यामुळे तलासरी, डहाणू आणि पालघर तालुक्यातील बाधित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्तांसाठी मदत, पुनर्वसन, आवश्यक सेवा पूर्ववत करणे तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या मदतकार्यात CSR संस्थांच्या सहकार्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे.

निऑन फाउंडेशनने ३,१०० बिगर-अन्न मदत किट्स, तर सनटेक फाउंडेशनने १,००० अन्नधान्य किट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. निऑन फाउंडेशनच्या मदत किट्सचे वितरण तलासरी येथे २,०००, पालघर तालुक्यातील नागझरी येथे ६०० आणि डहाणू येथे ५०० अशा पद्धतीने करण्यात आले.

बिगर-अन्न मदत किटमध्ये ब्लँकेट, चटई, टॉवेल, वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य, ORS टेट्रा पॅक तसेच अन्य अत्यावश्यक घरगुती वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे पूरामुळे घरगुती साहित्याचे नुकसान झालेल्या कुटुंबांना दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मोठी मदत होत आहे.
दरम्यान, सनटेक फाउंडेशनकडून देण्यात आलेल्या १,००० अन्नधान्य किट्समध्ये तांदूळ, गहू, साखर, खाद्यतेल, चहा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. या मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांच्या तातडीच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी RO टँकरची सुविधा
पूरग्रस्त भागांमध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी निऑन फाउंडेशनने नागझरीसह सर्वाधिक बाधित भागांमध्ये सलग चार दिवसांहून अधिक काळ तीन RO पाणी टँकर उपलब्ध करून दिले. नियमित पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत या सुविधेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेच्या गरजा लक्षात घेऊन निऑन फाउंडेशनने २,००० सॅनिटरी हायजीन किट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या किट्सचे वितरण डहाणू येथील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना करण्यात येणार आहे.
निऑन फाउंडेशनच्या टीमचा सक्रिय सहभाग
या मदतकार्याचे मार्गदर्शन निऑन फाउंडेशनचे विश्वस्त प्रविण जैन यांनी केले. त्यांच्या समवेत प्राची जैन, संध्या पाटील, निऑन लॅबोरेटरीज लिमिटेडच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक तसेच फाउंडेशनच्या कार्यसंघाने आणि स्वयंसेवकांनी मदत साहित्य जलदगतीने बाधित कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

जिल्हा प्रशासनाने निऑन फाउंडेशन आणि सनटेक फाउंडेशनच्या वेळेवर मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. उद्योग, CSR भागीदार, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी मदत पोहोचविणे शक्य होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पुनर्वसनाच्या कामाला प्रशासनाची गती
पूरस्थितीनंतर जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य, अत्यावश्यक सेवा पूर्ववत करणे, नुकसानीचे पंचनामे आणि पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार आर्थिक मदत देण्याचे काम सुरू आहे. जीवितहानी, घरांचे नुकसान, पशुधनाची हानी तसेच घरगुती वस्तूंच्या नुकसानीबाबत पात्र नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तसेच पूरामुळे बाधित झालेल्या रस्ते, पूल आणि अन्य सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीला प्राधान्य देण्यात येत आहे.
“प्रत्येक पात्र पूरग्रस्त कुटुंबाला वेळेत आवश्यक मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे,” असे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी सांगत निऑन फाउंडेशन आणि सनटेक फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

CSRच्या माध्यमातून मिळालेल्या या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाला हातभार लागला असून, प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून मदतकार्याला अधिक वेग मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button