
मुंबई | प्रतिनिधी : प्रीती गडा
वाहतुकीचा खोळंबा, पादचाऱ्यांची गैरसोय; ट्रॅफिक विभागाशी समन्वय साधून विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन
निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध मुख्य रस्ते तसेच अंतर्गत मार्गांवर बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्याच्या कडेला तसेच वाहतुकीच्या मार्गात अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने नागरिक, पादचारी आणि इतर वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः गर्दीच्या वेळेत रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. अनधिकृत पार्किंगमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, निर्मल नगर पोलीस ठाण्याचे नवीन PI अजय कुलकर्णी यांनी या समस्येकडे विशेष लक्ष द्यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पोलीस ठाणे आणि ट्रॅफिक विभाग यांच्यात समन्वय साधून बेकायदेशीर पार्किंगविरोधात नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कारवाईची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
केवळ अधूनमधून कारवाई न करता नो-पार्किंग क्षेत्रांची स्पष्ट पाहणी, नियमबाह्य पद्धतीने उभी केलेली वाहने हटविणे, आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे आणि पुन्हा त्याच ठिकाणी वाहने उभी राहणार नाहीत यासाठी नियमित गस्त वाढविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवीन पोलीस अधिकाऱ्यांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असून, निर्मल नगर परिसरातील बेकायदेशीर पार्किंगला आळा घालण्यासाठी PI अजय कुलकर्णी यांनी ट्रॅफिक विभागाशी चर्चा करून विशेष धडक मोहीम राबवावी आणि रस्ते नागरिकांसाठी मोकळे करावेत, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.