
पालघर | प्रतिनिधी
पालघर शहरातील देवीशा रोड ते वल्लीपाडा मार्गे गणेश कुंडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तातडीने स्ट्रीट लाईट (पथदिवे) बसविण्यात यावेत, तसेच बंद पडलेले पथदिवे त्वरित दुरुस्त करावेत, अशी आग्रही मागणी वीर फाउंडेशनच्या वतीने पालघर नगर परिषदेकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष विक्रम जैन व स्थानिक रहिवासी यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी पालघर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील (प्रभाग क्र. ५) तसेच नगरसेवक पुष्पा हिम्मतमल जैन (प्रभाग क्र. ५) यांना लेखी निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची विनंती केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवीशा रोड येथून पुढे वल्लीपाडा मार्गे गणेश कुंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पथदिव्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडतो. परिणामी पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्रीच्या अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून चोरीसारख्या अनुचित घटनांनाही खतपाणी मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची तात्काळ पाहणी करून आवश्यक त्या सर्व ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसविण्यात यावेत आणि सध्या बंद अवस्थेत असलेले पथदिवे त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी वीर फाउंडेशनने केली आहे.
यावेळी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत नगर परिषद प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहनही करण्यात आले. या मागणीला परिसरातील नागरिकांनीही मोठा पाठिंबा दर्शविला असून, पथदिव्यांच्या अभावामुळे अनेक वर्षांपासून निर्माण झालेली समस्या लवकरात लवकर सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
वीर फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम जैन यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने प्रकाश व्यवस्था उभारून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पालघर नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत त्वरित पथदिव्यांची उभारणी व दुरुस्तीची कामे सुरू केल्यास परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

