वेल्फेअर असोसिएशन सामाजिक ट्रस्टचा पुढाकार; धान्य व शालेय साहित्याचे वाटप

पालघर | प्रतिनिधी :

पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी रिपाई व बीजदत्त वेल्फेअर असोसिएशन सामाजिक ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. ट्रस्टच्या वतीने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट २०२६) वरोर, बावडे, कोळवली तसेच पालघर परिसरातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी शिरल्याने धान्य, घरगुती साहित्य, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेत ट्रस्टच्या वतीने सुमारे २५ ते ३० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक धान्य तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या मदतकार्यावेळी बीजदत्त वेल्फेअरचे चेअरमन सुरेश जाधव, दहाणू विभागातील सामाजिक कार्यकर्ते महेश पानेरे, दीपेश गायकवाड, सतीश घाडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमासाठी निऑन फाउंडेशनच्या संध्या पाटील, उद्योजक गोविंद सर, रिगल बुकचे सुमितभाई तसेच परीक्षित दांडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी, “समाजसेवा हाच आमचा ध्यास असून गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असा निर्धार व्यक्त केला. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळाल्याने नागरिकांनी ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button