
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्हा पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना पोल्ट्री फार्मवर डांबून ठेवत सक्तीची मजुरी करवून घेणाऱ्या आरोपीविरुद्ध धडक कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा तसेच वेठबिगार पद्धत (निर्मूलन) अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जव्हार तालुक्यातील धारणहट्टी येथील १५ व १२ वर्षीय दोन अल्पवयीन मुले १ ऑगस्ट २०२६ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी जव्हार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने विशेष शोधमोहीम सुरू केली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि तपासाच्या आधारे मुलांचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान वाडा तालुक्यातील मौजे कोणे येथील रहिवासी सचिन नारायण धसाडे याने खडकखड धरण परिसरातून या दोन्ही मुलांना “महिन्याला पाच हजार रुपये देतो” असे आमिष दाखवून त्यांच्या पालकांची परवानगी न घेता आपल्या पोल्ट्री फार्मवर नेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या तपासात आरोपीने मुलांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू दिला नाही. मुलांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही त्यांना दोन दिवस पोल्ट्री फार्मवर डांबून ठेवून सक्तीने काम करून घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन्ही मुलांची सुखरूप सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १३७(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यात पुढे कलम १४३(२), १४३(४) व १४३(५) यांची भर घालण्यात आली आहे. याशिवाय बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा, १९८६ मधील कलम १४ तसेच वेठबिगार पद्धत (निर्मूलन) अधिनियम, १९७६ मधील कलम १६ व १८ अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी सचिन धसाडे याला ४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, जव्हार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण पवार, वाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागेश कदम तसेच जव्हार व वाडा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, पोलीस हवालदार धोंडमारे, किणी, सोनावणे तसेच पोलीस नाईक अहिरे, भोगडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बालमजुरी, वेठबिगारी किंवा अल्पवयीन मुलांच्या अपहरणासारख्या कोणत्याही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ वर माहिती द्यावी. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अशा गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

