
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधातील मोहिमेला आणखी धार देत मोठी कारवाई केली आहे. तलासरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संयुक्त कारवाई करत मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटच्या ब्लॉकच्या आड लपवून दमन बनावटीच्या विदेशी दारूची महाराष्ट्रात अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला. या कारवाईत ३० लाख ७९ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुजरातच्या एका चालकाला अटक करण्यात आली आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या GJ-03/AZ-8544 क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या दमन बनावटीच्या विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
संशयित टेम्पो अडवून तपासणी केली असता सुरुवातीला त्यात सिमेंटचे ब्लॉक असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांनी बारकाईने पाहणी केल्यानंतर त्या ब्लॉकच्या आड मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी १० लाख ७९ हजार ४८० रुपयांची विदेशी दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण ३० लाख ७९ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी टेम्पो चालक अवलभाई काराभाई खोडीयार (वय ३२, रा. वडू फलियु, पोरबंदर, गुजरात) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३२/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बबन गावीत करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गिते तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अवैध दारू तस्करीविरोधात पालघर पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात अशा बेकायदेशीर धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
