
पालघर | प्रतिनिधी
डहाणू तालुक्यात २०२१ मध्ये घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकरणात पालघर येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे बालकांवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायव्यवस्थेची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी प्रमुल उर्फ प्रफुल्ल रत्ना घोषे (वय ५०, रा. वांगडपाडा, रानशेत, ता. डहाणू) याने २७ सप्टेंबर २०२१ रोजी टाकाजवळील झाडाझुडपात ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस, मानेवर आणि तोंडावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेदरम्यान घटनास्थळी आलेल्या फिर्यादीवरही आरोपीने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमे तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (बोईसर विभाग) नित्यानंद झा (भा.पो.से.) यांनी अत्यंत कौशल्याने करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने २४ साक्षीदारांची साक्ष आणि इतर वैज्ञानिक व दस्तऐवजी पुराव्यांचा सखोल विचार केला. पुरावे ठोस असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा. अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. आर. राहाणे (पालघर-१) यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला भारतीय दंड संहितेतील कलम ३०२, ३०७, ३७६ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अन्वये दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. याशिवाय आरोपीवर ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास १ वर्ष ६ महिन्यांच्या अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकारी नित्यानंद झा, कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या नरेश बोरे आणि पोलीस उपनिरीक्षक संजय गावड यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या निर्णयानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, बालकांवरील अत्याचार आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने दिलेल्या कठोर शिक्षेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
