१४ ऑगस्टला दुपारी १२:३९ वाजता दोन मिनिटे स्तब्धता; पाच वीर हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण

पालघर | प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालघरच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा देत १४ ऑगस्ट रोजी शहरातील नागरिकांकडून पाच वीर हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात येणार आहे. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान पालघरच्या भूमीत घडलेल्या शौर्यगाथेची आठवण आजही नागरिकांच्या मनात जिवंत आहे.
१४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघर व परिसरातील सुमारे ८ ते १० हजार नागरिक अहिंसक मार्गाने आंदोलनासाठी एकत्र आले होते. आंदोलकांनी तत्कालीन चौकाच्या दिशेने मोर्चा काढला असताना ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पालघरचे पाच तरुण हुतात्मा झाले. गोविंद ठाकूर (नांदगाव), काशिनाथ पागधरे (सातपाटी), रामप्रसाद तिवारी (पालघर), सुकूर मोरे (सालवड) आणि रामचंद्र चुरी (मुरबे) यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
यापैकी गोविंद ठाकूर हे अवघे १७ वर्षांचे होते. गोळीबारात जखमी झाल्यानंतरही त्यांनी हातातील तिरंगा सोडला नाही, अशी या ऐतिहासिक आंदोलनाची भावस्पर्शी आठवण सांगितली जाते. या संघर्षाची साक्ष देणारा रक्ताने माखलेला ऐतिहासिक तिरंगा आजही जतन करून ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
१२:३९ वाजता दोन मिनिटे स्तब्धता
या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक १२:३९ वाजता पालघर शहर दोन मिनिटांसाठी स्तब्ध होते. रस्ते, दुकाने, शाळा आणि विविध ठिकाणचे दैनंदिन व्यवहार काही क्षणांसाठी थांबवून नागरिक हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतात.
यंदाही नागरिकांनी हुतात्मा चौक येथे एकत्र येऊन पाच वीर हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘पाचबत्ती’ नव्हे, ‘हुतात्मा चौक’!
पालघरच्या या ऐतिहासिक स्थळाची ओळख ‘हुतात्मा चौक’ म्हणून जपण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि ये-जा करणाऱ्यांनी या चौकाला ‘पाचबत्ती चौक’ असे न म्हणता ‘हुतात्मा चौक’ या नावानेच संबोधून हुतात्म्यांच्या स्मृतीचा सन्मान करावा, अशी भावना व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पालघरच्या या पाच वीरांच्या त्यागामुळेच आजची पिढी स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी दोन मिनिटे स्तब्ध राहून या हुतात्म्यांना अभिवादन करणे ही केवळ परंपरा नसून पालघरच्या इतिहासाप्रती आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जबाबदारी आहे.
