
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गणेशजी नाईक यांच्या दालनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अर्थात सामाजिक न्याय भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व्हे क्रमांक १५ मधील ५ एकर जागा आंबेडकर भवनासाठी देण्याचा निर्णय अंतिम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीस जॉईंट एम.डी. देशमुख , पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, समाज कल्याण अधिकारी पी. जी. वाबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)चे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव तसेच तहसीलदार भाले राव आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपलब्ध १०३ हेक्टर क्षेत्रापैकी सर्व्हे क्रमांक १५ मधील ५ एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी देण्याचा निर्णय निश्चित झाल्याने पालघर जिल्ह्यातील बहुजन बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१७ पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा
या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)च्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन २०१७ पासून सातत्याने पाठपुरावा केला. विविध निवेदने, बैठका आणि प्रशासनाकडे केलेल्या मागण्यांमधून आंबेडकर भवनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरण्यात आली होती.
या मागणीला राष्ट्रीय पँथर तसेच इतर सामाजिक संघटनांनीही पाठिंबा देत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे या सर्व संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे RPIच्या वतीने सांगण्यात आले.
बहुजन समाजासाठी ऐतिहासिक पाऊल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक न्यायाच्या चळवळीला बळकटी आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी पालघरमध्ये सुसज्ज आंबेडकर भवनाची आवश्यकता अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. आता ५ एकर जागेचा निर्णय झाल्याने या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निर्णयाबद्दल पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांचे बहुजन समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
“वर्षानुवर्षांच्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश असून, पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” अशी भावना रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी व्यक्त केली.