
वरोर, डहाणू | प्रतिनिधी
वाढवण बंदर आणि संबंधित प्रकल्पांविरोधात डहाणू तालुक्यातील वरोर येथे गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत स्थानिक मच्छीमार, आदिवासी, शेतकरी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या.
यावेळी पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर, डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्षा वर्षा वैद्य आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नामदेव पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या स्थानिकांनी वाढवण बंदरामुळे जमीन, समुद्र, मासेमारी, शेती, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत आपली भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.
हर्षवर्धन सपकाळ यांचा ठाम पाठिंबा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला पक्षाचा ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेच्या जमीन, समुद्र आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील हक्कांचे संरक्षण तसेच पर्यावरण आणि उपजीविकेचे प्रश्न यासाठी काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे. स्थानिकांच्या मागण्या लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवून या विषयावर आवश्यक ती भूमिका घेण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
“विकास हवा; पण जनतेच्या हक्कांची आणि निसर्गाची किंमत मोजून नाही”
आंदोलनस्थळी बोलताना पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र स्थानिकांची उपजीविका हिरावून घेणारा आणि निसर्गाचा विनाश करणारा विकास आम्हाला मान्य नाही. पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पूर्ण ताकदीने या लढ्यात स्थानिक जनतेच्या पाठीशी उभी आहे.”
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमार, शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळाल्याने या प्रश्नाला अधिक व्यापक स्वरूप येण्याची शक्यता आहे.
गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्थानिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात वाढवण बंदराचा मुद्दा राज्याच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“विकास हवा; मात्र जनतेच्या हक्कांची, उपजीविकेची आणि निसर्गाची किंमत मोजून नाही,” असा स्पष्ट संदेश देत काँग्रेसने स्थानिकांच्या मागण्यांना आपला ठाम पाठिंबा दर्शविला आहे.

