बिबट्या प्रवण क्षेत्रात सावधगिरीचा इशारा; नागरी संरक्षण स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण

बोईसर | प्रतिनिधी

बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्त्यांमध्ये वन्यजीवांच्या होणाऱ्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसह वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी नागरी संरक्षण स्वयंसेवकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत विशेष नागरी संरक्षण दल, तारापूर, जिल्हा पालघर यांच्या वतीने बोईसर विधानसभा क्षेत्रात ‘डिव्हिजनल डे’ निमित्त हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पालघर जिल्हा उपनियंत्रक के. आर. कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बोईसर विधानसभा क्षेत्राचे विभागीय क्षेत्ररक्षक नरेश अनंत म्हस्के यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

बिबट्या दिसला तर घाबरू नका; गर्दी करू नका!

Wildlife Conservation Animal Welfare Associationचे सूर्यहास चौधरी आणि भावेश बाबरे यांनी स्वयंसेवकांना बिबट्याचा वावर आढळल्यास घ्यावयाची खबरदारी, नागरिकांना द्यावयाच्या सूचना आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बिबट्या हा वन्यजीव असून त्याच्या अधिवासाजवळ मानवी वस्ती वाढल्याने मानव-बिबट्या संघर्षाची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याचा पाठलाग करणे, दगड मारणे अथवा त्याला चिथावणी देणे टाळावे. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये आणि अफवा पसरविण्याऐवजी वनविभाग व संबंधित प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीत स्वयंसेवकांची भूमिका महत्त्वाची

बिबट्या प्रवण भागातील संभाव्य धोके ओळखणे, नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना समजावून सांगणे, अफवा रोखणे आणि वनविभाग व प्रशासनाशी समन्वय साधणे याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यजीवांचे संरक्षण या दोन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button