वडार समाजाचा पालघर जिल्हा संकल्प मेळावा उत्साहात संपन्नएकजूट, हक्क आणि संघटनशक्तीचा निर्धार; राज्यस्तरीय भव्य मेळाव्याचा विजय दादा चौगुले यांचा संकल्प

मनोर | प्रतिनिधी :

वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय प्रश्नांसाठी समाजबांधवांनी संघटित होऊन एकजुटीने लढा उभारावा, या संदेशासह ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचा पालघर जिल्हा संकल्प मेळावा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेते श्री. विजय दादा चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास पालघर जिल्ह्यासह वसई-विरार, बोईसर, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मनोर, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा मेळावा वडार समाजाच्या संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला.

सुधीर पवार यांचे संघटनात्मक योगदान मोलाचे
महाराष्ट्रातील संपूर्ण वडार समाजाला एकत्र आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. सुधीर पवार यांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

संघटनेसाठी दिवस-रात्र झटणारे, कोणत्याही वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारे आणि समाजातील प्रत्येक घटकाला संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न करणारे सुधीर पवार हे संघटनेचे महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याची भावना अनेक पदाधिकारी व समाजबांधवांनी व्यक्त केली.

समाजाच्या प्रश्नांसाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि वडार समाजामध्ये एकजुटीचा संदेश पोहोचविण्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

प्रभावी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात श्री. विजय सुरवसे यांच्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर निवृत्त अपर सचिव अधिकारी श्री.बंद पट्टे साहेब यांनी समाजासमोरील विविध शासकीय आणि प्रशासकीय समस्यांवर मार्गदर्शन केले. मंत्रालयात कार्यरत असताना समाजातील अनेक गरजू नागरिकांना मदत केल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.

मेळाव्यास कार्याध्यक्ष श्री. चितामण धोत्रे, मंत्रालयीन स्तरावरील मान्यवर, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे, मुंबई संपर्क प्रमुख श्री. संजय इरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

“समाज एकत्र आला तरच प्रश्न सुटतील” — विजय दादा चौगुले

मेळाव्याचे अध्यक्ष आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजय दादा चौगुले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात समाजाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. वैयक्तिक स्वार्थ, मतभेद आणि गटबाजी बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

“माझ्यासाठी कोणी कोल्हापुरात येऊ नका, तर समाजाच्या हक्कासाठी आणि समाजहिताच्या तीन शब्दांसाठी एकत्र या. समाज एकवटल्याशिवाय आपल्या प्रश्नांचे निराकरण होणार नाही,” असे स्पष्ट आणि भावनिक आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.

वडार समाजाने आपली संघटनशक्ती दाखवून दिली तरच प्रलंबित प्रश्नांवर प्रभावीपणे लढा देता येईल, असे सांगत त्यांनी आगामी काळात कोल्हापूर येथे भव्य राज्यस्तरीय वडार समाज मेळावा आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला.

जातीचे दाखले, वडार भवन आणि घरकुलाच्या प्रश्नांवर चर्चा

पालघर जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष शिंदे यांनी वडार समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळविताना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वसई-विरार परिसरातील पदाधिकारी श्री. नागेश के. शेळकेदिनेश गुंजाळ असे झाले आहे तेथे जितेश गुंजाळकर यांनी समाजासाठी स्वतंत्र ‘वडार भवन’ उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली.

पालघर परिसरातील झोपडपट्टीवासीयांसह विविध नागरिकांच्या प्रश्नांनाही यावेळी वाचा फोडण्यात आली. श्री. रामदास शिंदे यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या मांडल्या, तर अनेक महिला आणि समाजबांधवांनी आपल्या व्यथा व प्रश्न उपस्थित केले.

उपाध्यक्ष श्री. संदीप शिंदे यांनी घरकुल योजनांसंदर्भात माहिती देताना समाजातील गरजू नागरिकांसाठी घरकुले मंजूर करून आणण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. सुधीर पवार यांनी समाजबांधवांना एकजुटीचा संदेश देत संघटनेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

दीपक माने यांच्या नियोजनामुळे आयोजनाला विशेष यश

मनोर येथे आयोजित या संपूर्ण मेळाव्याच्या यशस्वी नियोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी श्री. दीपक माने यांनी सांभाळली. बॅनर, स्टेज, साऊंड सिस्टीम, हॉल व्यवस्था तसेच कार्यक्रमाच्या विविध नियोजनापासून ते संपूर्ण व्यवस्थापनापर्यंत त्यांनी विशेष मेहनत घेतली.
त्यांना नागझरी येथील श्री. अशोक नलावडे आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. संघटनेचे सचिव श्री. वामन पवार यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

वसई-विरार ते डहाणूपर्यंत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मेळावा यशस्वी करण्यासाठी वसई-विरार परिसरातील श्री. शरद बनकर (उपाध्यक्ष), श्री. नागेश के. शेळके, श्री. जितेश गुंजाळकर आणि श्री. बबन शेळके यांनी मोठ्या प्रमाणात समाजबांधवांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

पालघरमधून श्री. सूरज धोत्रे, श्री. कैलास पवार, संजू धोत्रे, श्री. रामदास शिंदे, श्री. सतीश शिंदे, श्री. सागर शिंदे, श्री. संजय शिंदे, श्री. किरण शिंदे, श्री. रुपेश पवार, श्री. राजेश गायकवाड, श्री. संतोष पवार आणि श्री. शंकर शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली.
बोईसर परिसरातून श्री. संदीप शिंदे (उपाध्यक्ष) आणि श्री. दीपक जाधव (संघटक) यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

डहाणू परिसरातून श्री. राजेश गुजर, श्री. लहू पवार, श्री. बबलू गुजर, श्री. विनोद पवार, श्री. रोहित पवार आणि श्री. आकाश गुजर यांनी समाजबांधवांना मेळाव्यात सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

वाडा येथून श्री. प्रकाश पवार आणि श्री. श्रावण दिंडे, विक्रमगड येथून श्री. लक्ष्मण जाधव आणि त्यांची टीम, तर मनोर येथून श्री. सुभाष काळे, श्री. संतोष काळे, श्री. शिवाजी जाधव आणि श्री. हनुमान देवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नागझरी येथून श्री. अशोक नलावडे, श्री. किसन नलावडे, श्री. आकाश वाघमारे, श्री. सखाराम गुंजकर आणि श्री. विजय मंजुळकर यांनीही कार्यक्रमाच्या यशात सक्रिय योगदान दिले.
ठाणे जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप धोत्रे, तर मुंबईतून उद्योजक श्री. संजय भोसले, मुंबई संपर्क प्रमुख श्री. संजय इरकर तसेच पत्रकार श्री. संदीप जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली.

नव्या संघर्षाची आणि संघटनशक्तीची सुरुवात
पालघर जिल्ह्यातील वडार समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठविणे, जातीचे दाखले, घरकुल, निवास, सामाजिक विकास आणि इतर प्रलंबित प्रश्नांसाठी संघटित लढा उभारणे, असा निर्धार यावेळी समाजबांधवांनी व्यक्त केला.

पालघर जिल्हा संकल्प मेळाव्यातील मोठ्या प्रमाणातील उपस्थिती, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेत्यांनी दिलेला एकजुटीचा संदेश यामुळे वडार समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी काळात समाजाच्या हक्कांसाठी अधिक व्यापक आणि प्रभावी संघर्ष उभारण्याची दिशा या मेळाव्याने दिली असल्याची भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.

“एकजूट, संघटन आणि समाजहितासाठी संघर्ष” हा संदेश देत ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचा पालघर जिल्हा संकल्प मेळावा उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

उत्कृट सूत्र संचालन श्री. तांबे सर यांनी केले त्यामुळे कार्यक्रमाला रंगत आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button