
पालघर | प्रतिनिधी :
समाजातील वंचित व गरजू घटकांना शासकीय योजनांचा लाभ थेट मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ अंतर्गत पालघर तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांचे वितरण गुरुवारी, १० सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पालघर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात एकूण ४५ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. शासकीय यंत्रणेच्या या संवेदनशील आणि लोकाभिमुख उपक्रमाचे लाभार्थ्यांनी स्वागत केले.
या कार्यक्रमाला पालघरचे आमदार राजेंद्र गावित, तहसीलदार शेळके साहेब, नायब तहसीलदार गावित साहेब तसेच पुरवठा अधिकारी बच्चे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिधापत्रिकेमुळे पात्र कुटुंबांना अन्नधान्याचा आधार मिळणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग नागरिकांसाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व पुरवठा विभागाकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्या गरजूंपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालघर प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे दर्शन घडले.