
पालघर | प्रतिनिधी :
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात तसेच शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, या सामाजिक भावनेतून बीज दत्ता वेलफेअर असोसिएशन (सामाजिक, आरोग्य व एज्युकेशन ट्रस्ट) आणि रिपाई पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी लोकमान्य नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेयपयोगी साहित्य आणि सॉक्सचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळोपयोगी वस्तू तसेच सॉक्स देण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढाकार घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बीज दत्ता वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन तथा रिपाईचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी भूषविले. यावेळी युवा कार्यकर्ते दिपेश गायकवाड, मोहनीस जाधव, ग्रामविस्तार अधिकारी नितीन पाटील, श्री. तलवार तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.
या उपक्रमाला विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोविंदू सर, रिंगल बुकचे सुमित भाई, परीक्षित दांडेकर, आर्किटेक्ट महेंद्र काळे, निओनच्या संध्या पाटील मॅडम आणि ईशी इंडस्ट्रीजचे शैलेश भाई यांनी या सामाजिक उपक्रमासाठी बहुमूल्य योगदान दिले.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे म्हणजे त्यांच्या भविष्यातील यशासाठी एक सकारात्मक पाऊल असल्याची भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. केवळ आर्थिक मदत न करता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.
“गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेला प्रत्येक हातभार हा त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणूक आहे,” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. समाजातील अधिकाधिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि नागरिकांनी अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.