गणेशोत्सवानिमित्त पालघर जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ अभियान

पालघर | प्रतिनिधी :

गणेशोत्सवातील सलग १० दिवस मोफत आरोग्य तपासणी, निदान व उपचार सेवा; नागरिकांना शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील नागरिकांना सहज, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या विशेष आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर यांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या अभियानाचा उद्देश गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक निदान, डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी रेफरल सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.

गणेशोत्सवातील सलग १० दिवस पालघर जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण रुग्णालये (RH), उपजिल्हा रुग्णालये (SDH), प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), उपकेंद्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), हेल्थ अँड वेलनेस सेंटर (HWC) तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ (HBT) यांसह संबंधित शासकीय आरोग्य संस्थांचा सहभाग राहणार आहे.

या शिबिरांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, उपलब्ध सुविधांनुसार आवश्यक विविध तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार करण्यात येतील. ज्या रुग्णांना पुढील उपचारांची आवश्यकता असेल, त्यांना योग्य आरोग्य संस्थेकडे रेफरल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘उत्सव आरोग्याचा, संकल्प निरोगी पालघरचा’ या भावनेतून गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य सेवा नागरिकांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात येत आहे. उत्सवाच्या धावपळीत नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या अभियानाचा लाभ घ्यावा, असा संदेश आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वसई-विरार शहर महानगरपालिका आरोग्य यंत्रणा तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर आणि संबंधित शासकीय आरोग्य संस्थांमध्ये समन्वयाने नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी
गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण असला तरी त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या विशेष आरोग्य शिबिरात सहभागी होऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button