गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद २०२६’; गणेशभक्तांना शासकीय योजनांची माहिती

पालघर | प्रतिनिधी

पालघर शहरातील गणेशकुंड येथे दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्याला मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर नागरिकांशी थेट संवाद साधत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा माहिती कार्यालय, पालघर यांच्या वतीने गणेशभक्त व नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासनाचे उपक्रम तसेच नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने प्रत्यक्ष संवादातून जनजागृती करण्यात आली.

यावेळी विविध योजनांचे अर्ज किंवा फॉर्म कुठे आणि कसे भरायचे, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी होते आणि निवड झाल्यानंतर कोणते लाभ मिळतात, याबाबत नागरिकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.

शासकीय योजनांची माहिती केवळ प्रसिद्धी माध्यमांपुरती मर्यादित न ठेवता ती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि पात्र नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गणेश विसर्जनासाठी एकत्र आलेल्या भाविकांना ‘योजना जाणून घ्या, पात्र असाल तर लाभ घ्या’ असा संदेश देण्यात आला.


गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा सुंदर संगम साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश विसर्जनासारख्या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button