
पालघर | प्रतिनिधी
बोईसर येथे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्याच्या खात्यातील तब्बल ५० हजार रुपये लंपास करणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली. आरोपीकडून ३८ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.०५ वाजता बाबूलाल नेमाराम परमार (वय ३८, रा. साईदीप अपार्टमेंट, त्रिवेणीनगर, सरावली, बोईसर) हे बोईसर सर्कस ग्राउंडजवळील पुरोहित थाल हॉटेलखाली असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
यावेळी त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने एटीएम व्यवहाराच्या वेळी संधी साधून हातचलाखीने परमार यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर आरोपीने मिळवलेल्या कार्डाचा गैरवापर करून त्यांच्या बँक खात्यातून एकूण ५० हजार रुपये काढून घेतले. आपल्या कार्डाची अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर परमार यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपीचा माग
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, उपलब्ध माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.
तपासादरम्यान आरोपीची ओळख अफसर अब्दुल गफार खान (वय ३९) अशी निष्पन्न झाली. तो सध्या शास्त्रीनगर, कलिना, सांताक्रूझ, मुंबई येथे राहत असून मूळचा राणीगंज, ता. दिलीपपूर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.२६ वाजता सांताक्रूझ, मुंबई येथून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीच्या रकमेपैकी ३८ हजार रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
बोईसर व सायवन पोलिसांसह सायबर पथकाची भूमिका
या कारवाईत बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विनय मोरे तसेच पोलीस अंमलदार विजय दुबळा, निरज शुक्ला, सुनील मलावकर, योगेश गावित, गणेश व्हसकोटी, मयुर पाटील, धिरज साळुंखे, देवेंद्र पाटील, मच्छिंद्र घुगे, शुभम सपकाळे, सचिन सोनावणे, रोहित पाटील आणि किरण वाघ यांनी सहभाग घेतला.
तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अक्षय शेट्ये आणि रुपेश पाटील यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (बोईसर विभाग) दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय मोरे करीत आहेत.
एटीएम वापरताना नागरिकांनी सतर्क राहावे
दरम्यान, एटीएममधून पैसे काढताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळावे, एटीएमचा पिन कोणालाही सांगू नये, व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कार्ड स्वतःचेच असल्याची खात्री करावी आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ बँक व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
