
पालघर | प्रतिनिधी
गणेशभक्तांसाठी होडीसह मनुष्यबळ उपलब्ध; ‘सेवा हीच खरी गणेशभक्ती’चा दिला संदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवाराने गणेशभक्तांसाठी कौतुकास्पद आणि समाजोपयोगी उपक्रम राबविला. गणेशमूर्तींचे सुरक्षित व सुलभ विसर्जन करता यावे, यासाठी परिवाराच्या वतीने समुद्रात विनामूल्य होडीसेवा तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी पालघर शहरासह परिसरातील विविध भागांतून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपती घेऊन आलेल्या असंख्य भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. गणेशमूर्ती समुद्रात सुरक्षितपणे नेऊन विसर्जित करण्यासाठी होडीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी मांगेलआळी परिवारातील सदस्य व तरुणांनी प्रत्यक्ष समुद्रात उतरून आवश्यक सहकार्य केले.
गणेश विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी, सुरक्षिततेची आव्हाने आणि भाविकांची होणारी धावपळ लक्षात घेऊन परिवाराने घेतलेल्या या पुढाकारामुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सुलभ झाली. कोणतेही शुल्क न आकारता सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला.
‘गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सेवा, सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. सेवा हीच खरी गणेशभक्ती या भावनेतून हा उपक्रम कोणत्याही शुल्काशिवाय राबविण्यात आला,’ अशी भावना शिरगाव मांगेलआळी परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
समुद्राच्या सान्निध्यात बाप्पाला सुरक्षितपणे निरोप देताना भाविकांना परिवाराच्या सदस्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले. निस्वार्थ भावनेने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
गणेशभक्तांसाठी विनामूल्य होडीसेवा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या शिरगाव मांगेलआळी परिवाराच्या या उपक्रमाचे पालघर परिसरातील नागरिक, गणेशभक्त आणि विविध स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक सेवेची ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.