तवा परिसरातील थरारक अपघातामुळे वाहतूक ठप्प; दूध गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड, महामार्गाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

कासा | प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा गावाजवळ सोमवारी दुपारी अमूल कंपनीचा दूध टँकर दुभाजकाला जोरदार धडकून पलटी झाल्याची थरारक घटना घडली. गुजरातहून विरारच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दूध घेऊन जाणारा टँकर अचानक अनियंत्रित झाला आणि दुभाजकावर आदळल्यानंतर दुसऱ्या लेनमध्ये जाऊन उलटला. या अपघातानंतर टँकरमधील मोठ्या प्रमाणातील दूध महामार्गावर सांडल्याने काही काळ रस्त्यावर अक्षरशः ‘दुधाची नदी’ वाहताना दिसून आली.

अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. टँकरमधून दूध मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे पाहून काही नागरिकांनी बाटल्या, ड्रम, कॅन आणि मिळेल त्या भांड्यांमध्ये दूध जमा करण्यासाठी धावपळ केली. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ मोठी गर्दी निर्माण होऊन परिस्थिती आणखी बिकट झाली.


चालक घटनास्थळी दिसला नाही

विशेष म्हणजे, टँकर पलटी झाल्यानंतर त्याचा चालक घटनास्थळी आढळून आला नाही. चालक स्वतःहून तेथून निघून गेला की अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी हलविण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चालकाच्या अनुपस्थितीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस, महामार्ग रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेला टँकर हटविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या.

गुजरातच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा
टँकर पलटी झाल्याने तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूध सांडल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अपघातग्रस्त टँकर हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे काम करण्यात आले.


अपघातांचे सत्र सुरूच; महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्गाच्या सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्याची खराब अवस्था, काही ठिकाणी असलेले खड्डे, धोकादायक वळणे, अपुरे किंवा अस्पष्ट दिशादर्शक फलक आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच चारोटी फ्लायओव्हरवर रसायन वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता तवा परिसरात दूध टँकरचा अपघात झाल्याने या मार्गावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

‘ब्लॅक स्पॉट’ची पाहणी कधी होणार?

महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी केवळ अपघातानंतरची वाहतूक सुरळीत करण्यापुरती कारवाई न करता अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) तातडीने पाहणी करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

रस्त्याची आवश्यक दुरुस्ती, धोकादायक ठिकाणी स्पष्ट दिशादर्शक फलक, योग्य प्रकाशव्यवस्था, दुभाजकांची सुरक्षित रचना, अवजड वाहनांसाठी आवश्यक सुरक्षा उपाय आणि नियमित देखरेख याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा आज रस्त्यावर दूध सांडले; उद्या एखाद्या गंभीर दुर्घटनेत मानवी जीवितहानी झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button