
पालघर | प्रतिनिधी
सुन्नी जामा मस्जिद, पालघर तसेच समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने ‘अकरावी शरीफ’ अर्थात गौस-ए-पाक निमित्त पालघर शहरात भव्य जुलूस (मिरवणूक) उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात काढण्यात आला. या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील नागरिक, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
गौस-ए-पाक हा मुस्लिम समाजात श्रद्धेने स्मरण केला जाणारा हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी (रह.) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित धार्मिक सोहळा असून, ‘अकरावी शरीफ’ म्हणूनही तो ओळखला जातो. यानिमित्त पालघरमध्ये काढण्यात आलेल्या जुलूसदरम्यान डफलीच्या तालावर नात-ख्वानी व धार्मिक घोषणा देत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी पालघर पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले होते.पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली.
मिरवणूक मार्गावरील बंदोबस्ताची जबाबदारी पालघर वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली PSI पवार, PSI पाडावी, HC घोडे तसेच PC देशमुख, केदार, शोहेब, वाळुंज, गिरी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, अंमलदार व महिला पोलीस कर्मचारी तैनात होते.
पोलिसांच्या नियोजनामुळे मिरवणुकीदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिली. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊनही जुलूस शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. मुस्लिम समाज बांधवांनीही पोलिसांना सहकार्य करत प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले.
शांतता, सौहार्द आणि बंधुभावाचा संदेश देत गौस-ए-पाक निमित्तचा हा जुलूस पालघर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.