
पालघर | प्रतिनिधी
पालघर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बीज मोहन निर्मल असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती ॲक्टिव्हा दुचाकीवरून घरी जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकीस्वाराचा ताबा सुटून तो बाजूने जात असलेल्या टँकरच्या दिशेने फेकला गेला. यावेळी तो टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा गंभीर अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यावरील खड्डे केवळ गैरसोय नसून नागरिकांच्या जीवावर बेतणारा गंभीर प्रश्न बनला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, पालघर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असताना त्यांची तातडीने दुरुस्ती किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पालघर नगरपरिषद किंवा अन्य कोणत्या यंत्रणेच्या अखत्यारीत येतो, याची स्पष्टता करून संबंधित विभागाने या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खड्ड्यांची माहिती असूनही त्यावर वेळेत उपाययोजना होत नसतील, तर भविष्यात अशाच दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? असा थेट प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने केवळ अपघातानंतर पाहणी करून थांबण्याऐवजी शहरातील धोकादायक खड्ड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करावी. तसेच अपघातप्रवण ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना, प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक त्या सूचना फलकांची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एक निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या नागरिकाच्या जीवाची वाट पाहणार? असा संतप्त सवाल आता पालघरकरांकडून उपस्थित केला जात आहे.