
पालघर | प्रतिनिधी
बोईसर परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून पलायन करणाऱ्या सराईत आरोपीला पालघर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि बोईसर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या संयुक्त कारवाईत प्रदीप सोमनाथ बॅनर्जी (वय ५०, रा. यादवनगर, बोईसर पूर्व, मूळ पश्चिम बंगाल) याला २६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची एक्टिवा स्कुटी जप्त करण्यात आली आहे.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.५७ वाजता वारंगडे, तळेकरपाडा येथील रहिवासी संगिता संजय गोलीम (वय ३५) या महागाव रोडवरील पॉवर ग्रिडसमोरून पायी घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कुटीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत धागेदोरे
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्याची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करत गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान बोईसर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत आरोपी प्रदीप बॅनर्जी याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. अखेर २६ सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मंगळसूत्रासह गुन्ह्यातील दुचाकीही जप्त
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची एक्टिव्हा स्कुटी जप्त केली आहे. या कारवाईमुळे बोईसर परिसरातील महिलांना लक्ष्य करून होणाऱ्या सोनसाखळी व मंगळसूत्र चोरीच्या घटनांवर पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, पोलीस अंमलदार संदीप सूर्यवंशी, कैलास पाटील, संजय धांगडा, पोलीस नाईक कल्याण केंगार, प्रशांत निकम आणि वैभव जामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड, बोईसर पोलीस ठाणे करीत आहेत.

