पालघर किनारपट्टीवर ‘सागरी कवच’ अभियान; दोन दिवस सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरसंशयास्पद बोट, व्यक्ती अथवा बेवारस वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन

सातपाटी | प्रतिनिधी

सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच किनारपट्टीवरून होणाऱ्या संभाव्य घुसखोरी व संशयास्पद हालचालींना आळा घालण्यासाठी सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय ‘सागरी कवच अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या किनारपट्टी भागात पोलीस, सागरी सुरक्षा पथक, तटरक्षक दल तसेच संबंधित विभागांच्या हालचाली वाढल्या असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
अभियानादरम्यान समुद्रकिनारा, जेट्टी, मच्छीमार वस्ती आणि संवेदनशील ठिकाणी विशेष पाहणी, गस्त व तपासणी करण्यात येत आहे. समुद्रातून किंवा किनाऱ्याच्या परिसरातून होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचालीवर सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
संशयास्पद हालचालींवर तातडीने माहिती द्या
किनारपट्टी भागात संशयास्पद बोट, अनोळखी व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून चौकशी अथवा हस्तक्षेप न करता तातडीने सातपाटी पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान नागरिकांनी संयम राखून सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

मासेमारांनी कागदपत्रे सोबत ठेवण्याच्या सूचना
अभियानाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात जाणाऱ्या मासेमारांनी अधिकृत ओळखपत्र तसेच बोटीशी संबंधित वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा तपासणीच्या वेळी आवश्यक ती माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, अभियानादरम्यान घडणाऱ्या घटनांबाबत कोणतीही अप्रमाणित माहिती, गैरसमज किंवा अफवा सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, असे पोलिसांनी नागरिकांना बजावले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध विभागांचा सहभाग
‘सागरी कवच अभियान २०२६’च्या नियोजन व अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालघरचे अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुर्वे यांच्यासह सागरी पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याशिवाय नागरी संरक्षण दलाचे पालघर विभागीय क्षेत्ररक्षक निलेश वझे, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, पोलीस मित्र तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही अभियानात सहभाग घेतला आहे. विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय राखून किनारपट्टी भागातील सुरक्षेला अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात येत आहे.

नागरिकांच्या सतर्कतेला महत्त्व

सागरी सुरक्षा ही केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि ग्रामस्थांचीही त्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी आणि सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन सातपाटी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सागरी सुरक्षेतील संभाव्य धोके वेळीच ओळखणे, किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करणे, हा ‘सागरी कवच अभियान २०२६’चा प्रमुख उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button