मनसेच्या पाठपुराव्याला यश; नवीन रस्त्यांवर कामाची कुंडली सांगणारे फलक!ठेकेदार, कामाचा कालावधी अन् दोष दायित्वाची माहिती नागरिकांसमोर; कार्तिक मैत्राणी यांच्या पाठपुराव्याचा दावा

पालघर | प्रतिनिधी

पालघर शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता संबंधित रस्त्याच्या कामाची संपूर्ण माहिती नागरिकांसमोर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर उपशहर अध्यक्ष कार्तिक विलास मैत्राणी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पालघर नगरपरिषदेने नवीन रस्त्यांच्या कामांवर कामाची माहिती तसेच दोष दायित्व (Defect Liability) कालावधी दर्शविणारे फलक लावण्याचे निर्देश ठेकेदारांना दिल्याचा दावा मनसेने केला आहे.

नवीन रस्ता तयार झाला की काही दिवसांतच त्यावर खड्डे, तडे किंवा अन्य दोष निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केला जातो. मात्र, रस्त्याच्या कामाची माहितीच उपलब्ध नसल्याने संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करणे अनेकदा कठीण जाते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नवीन रस्त्याच्या कामाची माहिती फलकाद्वारे नागरिकांसमोर ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या फलकावर संबंधित ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी, दोष दायित्वाचा कालावधी आणि कामासंबंधी आवश्यक माहिती नमूद केली जाणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम कोणाच्या माध्यमातून झाले, त्याची जबाबदारी किती काळ आहे आणि कामात दोष आढळल्यास संबंधित ठेकेदाराकडे जबाबदारी निश्चित करता येईल, अशी अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे केवळ रस्त्याच्या कामांमध्ये पारदर्शकता वाढणार नसून, करदात्या नागरिकांना आपल्या पैशातून झालेल्या विकासकामाची माहिती प्रत्यक्ष ठिकाणी मिळणार आहे. तसेच निकृष्ट काम झाल्यास त्याबाबत प्रशासनाकडे जाब विचारण्यासाठी नागरिकांना ठोस माहिती उपलब्ध होणार आहे.

“हा निर्णय मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेले यश आहे. पालघरकरांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्याचे काम यापुढेही सुरूच राहील,” असे मनसेकडून सांगण्यात आले.

“पाठपुरावा मनसेचा; फायदा थेट पालघरकरांचा!”
रस्त्याच्या कामावर माहितीचा फलक लागल्याने ‘काम झाले आणि जबाबदारी संपली’ या पद्धतीला आळा बसण्यास मदत होईल का, याकडे आता पालघरकरांचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्षात सर्व नवीन रस्त्यांवर हे फलक नियमितपणे लावले जातात का आणि दोष दायित्वाच्या कालावधीत रस्त्यांमध्ये दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई होते का, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button