पालघरमध्ये अग्निशमन दलाची कामगिरी! दोन भिंतींच्या अरुंद जागेत अडकलेल्या ७० वर्षीय वृद्धाची सुखरूप सुटका

पालघर: प्रतिनिधी

पालघर शहरातील भिमाई नगर, नवली येथे आज पहाटेच्या सुमारास एका ७० वर्षीय वृद्धाचे प्राण वाचवण्यात पालघर अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. दोन घरांच्या मधोमध असलेल्या अवघ्या १ फुटापेक्षा कमी अरुंद जागेत अडकलेल्या या वृद्धाची अग्निशमन दलाने भिंत फोडून अत्यंत कौशल्याने सुखरूप सुटका केली.


​मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास भिमाई नगर येथील विनोद विष्णू जाधव (वय ७० वर्षे) हे दोन घरांच्या मधील अत्यंत अरुंद अशा एका फुटापेक्षा कमी जागेत अडकल्याची माहिती पालघर अग्निशमन दलास मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
​घटनास्थळाची पाहणी केली असता, दोन भिंतींच्या मधील जागा अत्यंत कमी असल्याने आत शिरून थेट रेस्क्यू करणे अशक्य होते. यामुळे जवानांनी प्रसंगावधान राखत आणि विनोद जाधव यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत, त्यांच्या घराची भिंत फोडण्याचा निर्णय घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत काळजीपूर्वक भिंत फोडून विनोद जाधव यांना सुखरूप बाहेर काढले.


​सुटकेनंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी सरकारी दवाखाना, पालघर येथे दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी देवदूतासारख्या धावून आलेल्या अग्निशमन दलाच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे एका वृद्धाचा जीव वाचला असून, नागरिकांकडून अग्निशमन दलाचे आभार मानले जात आहेत.

​या यशस्वी बचाव मोहिमेत लीडिंग फायरमन रुचित दवणे, यंत्रचालक निलेश पाटील तसेच फायरमन संकेत पाटील, रुपेश पामाळे आणि मोहनिष पागधरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button